News - नाटकातून विद्यार्थ्यांनी उलगडले भवरलालजी जैन यांचे जीवन

अनुभूती स्कूलच्या स्थापना दिन सोहळ्यात भवरलालजी जैन यांच्या जीवन कार्याचे सादरीकरण

अनुभूती इंटरनॅशनल स्कूलच्या स्थापना दिन सोहळ्याचे उद्घाटन करताना निष्णात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुसील मुन्शी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, संचालक डॉ. एच.पी. सिंग, संचालिका सौ निशा जैन, प्राचार्य जे.पी. राव.

जळगाव, १४ : वाकोदसारख्या छोट्या खेड्यातील मुलगा ते विश्वविख्यात जैन उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष असे जीवन कार्याचे अत्यंत प्रभावी सादरीकरण अनुभूती निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले. नाटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भवरलालजी जैन यांचे जीवन उलगडून दाखविले. सुमारे अडीच तासांच्या या सादरीकरणाने अनुभूती स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक मंत्रमुग्ध झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही (१३ आणि १४ डिसेंबर रोजी) अनुभूती शाळेचा स्थापना दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. 13 रोजी सायंकाळी पाच वाजता निष्णात हृदयरोगतज्ज्ञ तथा भवरलालजी जैन यांचे मित्र पद्मश्री डॉ. सुसील मुन्शी यांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलननाने औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी दलुभाऊ जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, संचालक डॉ. एच.पी. सिंग, गिमी फरहाद, कविवर्य ना.धों. महानोर, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन, प्राचार्य जे.पी. राव उपस्थित होते.

भवरलालजी जैन यांच्या निर्वाणानंतर पहिलाच स्थापना दिवस साजरा करण्यात आला. त्यामुळे भाऊंच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रेरणादायी प्रसंग घेऊन केवळ मनोरंजनच नव्हे तर विद्यार्थ्यांना प्रेरणा घेता यावी या उद्देशाने या नाट्याची निर्मिती करण्यात आली. शेती, माती, पाणी, पर्यावरण या बाबींवर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे कार्य करणाऱ्या भवरलालजी जैन यांचा जीवनपट मांडणे आव्हानात्मक होते परंतु हर्षल पाटील यांच्या संकल्पनेतून, लेखन व दिग्दर्शनातून त्यांचे जीवन नाटकात यथार्थ साकारलेले आहे. या नाट्याचे वैशिष्ट्य असे की यात 318 विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सहभाग आहे. विशेषतः विद्यार्थ्यांनी अप्रतिम अभिनय केलेला बघायला मिळतो. सर्वच विद्यार्थ्यांनी दमदार अभिनय केला आहे. विशेषतः राधिका राठी (गौराबाईंची भूमिका), नीरज गिरी (दलिचंद जैन), दर्शन चोरडिया (भवरलालजी जैन), शुभम अग्रवाल (राणीदानजी जैन), तनु कांकरिया (कांताबाई) यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या. संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन हर्षल पाटील यांचे आहे. सहाय्य राहूल निंबाळकर, भाषांतर दिलीप जोशी, रुपांतर अबिरा मिश्रा याशिवाय नैपथ्य तन्मय कुंडू, सचिन राऊत, राम महातो, पार्श्व संगीत निखील क्षीरसागर, अमृतेश मिश्रा आणि तांत्रिक सहाय्य शशिकांत महोनोर यांचे लाभले. अनुभूतीच्या शिक्षक शिक्षकेतर सहकार्यांनी यासाठी परिश्रम घेतले, या कार्यक्रमासाठी राज्यासह देशातील विविध भागांतून विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Bhavarlalji Hiralalji Jain (Bhau)
         
Copyright © 2014 Jain Irrigation Systems Ltd, All Rights Reserved